इजा जाम झाली तुलाही मलाही

तरी मौज आली तुलाही मलाही


तिचे एवढे हाल झालेत की ती

'कसाई' म्हणाली तुलाही मलाही


किती काळ गेला तरी वेढुनी त्या

प्रथा आणि चाली तुलाही मलाही


इथे भेकडांची उभी फौज आहे

नकोशा मशाली तुलाही मलाही


"मुलांनो, जपा पोसणाऱ्या भुमीला"

धरा साद घाली तुलाही मलाही


पुरेपूर घ्यावी मजा जिंदगीची

जराशी मिळाली तुलाही मलाही


स्वतःच्या नशीबास आकार देऊ

अता कोण वाली तुलाही मलाही ?


विश्वजीत दीपक गुडधे,

अमरावती.