(तरही गझल)

एकदा तरी... 


पडेल का हवे तसेच दान एकदा तरी ?

बनेल का गरीब हा प्रधान एकदा तरी ?


रुसू नकोस पावसा ! असा यथेच्छ बरस की 

फुलेल हे उजाड माळरान एकदा तरी 


अता कुठे मुभा मला भिजायची, पळायची ?

बघेन होउनी पुन्हा लहान एकदा तरी 


मिळेल का कधी मला, स्वतःसवे बसायला ? 

जगून या युगात वेगवान एकदा तरी 


मिटून जात-पात, धर्म, संप्रदाय या जगी 

दिसेल का हरेक जण समान एकदा तरी ? 


हवी अशी बुलंद झेप जीवनात 'विश्वजित' 

तुझ्यापुढे झुकेल आसमान एकदा तरी


• विश्वजीत दीपक गुडधे,

अमरावती.

==================================


(क्रांति साडेकर यांच्या "पडेल का हवे तसेच दान एकदा तरी" या मिसऱ्यावर आधारित...)