का भांडले कळेना, मातीसवे बियाणे

नसतील त्यास दिसले, पत्रावळीत दाणे


हंगाम ह्या सुखांचा, गेल्यावरीच येते

हे दुःख बारमाही, झाले अता शहाणे


चौकात मागणारा, मुलगा मला म्हणाला :

"शाळेत न्याल का हो ? की द्याल फक्त नाणे ?"


गेली निघून मैना, तोडून पाश सारे

वस्तीत माणसांच्या, नाही तिची ठिकाणे


गेली हयात तेव्हा, आला निकाल हाती

सोडून द्यायचे का, न्यायालयात जाणे ?


डोळ्यांत बालकांच्या, स्वप्ने किती उद्याची

बहरेल देश माझा, ताज्या फुलाप्रमाणे


● विश्वजीत दीपक गुडधे,

अमरावती.