‘ति’चा जन्म

कोणासाठी आनंदाची पर्वणी

कोणासाठी डोईवर कर्ज होते

“वंशाचे दिवे” असणाऱ्यांना “मशाल” कुठे हवी असते?

 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

सभोवतालच्या वादळांना

खंबीरपणे सामोरी जाते

“ती” कुठे कोणास ठाऊक असते?

 

पूर्वी चूल आणि मूल यात

अडकवली गेलेली “ती”

आज प्रत्येक क्षेत्रात भरारी घेते

ती कुठे काय करते?


कधी मर्यादित आयुष्य जगणारी "ती"

स्वतःच्या पायावर उभी राहते

उराशी स्वप्ने घेऊन उडताना

"मानसिकतेच्या विळख्यातून" केव्हा बाहेर पडते?


कधी भूमीतून तर

कधी अग्नीतून जन्म घेणारी “ती”

अस्तित्वाच्या “अग्निपरीक्षेत”

कधी सुरक्षित राहते?


दुर्योधन, दुःशासनाला रोखणारे

भगवान श्रीकृष्ण तरी कसे येणार

राक्षसांचा वध करण्यास

पुन्हा एकदा ‘ति’लाच अवतरावे लागणार


‘ति’च्या वर लादलेल्या

मर्यादांशी द्वंद्व अखंड चालू राहते

एकदिवसीय मानसन्मानाची

तिला कुठे अपेक्षा असते?


जबाबदारीच्या धाग्यासमवेत

“ती” नेहमीच बांधील असते

पडद्याआड भूमिका निभावणारी

प्रेक्षकांना कुठे दिसते?

  

युद्धभूमीवर लढण्यासाठी

‘ति’च्या क्षमतेवर आपण सांशक होतो

“झाशीची राणी” ते “आझाद हिंद सेना” या

रणरागिणींच्या शौर्याचा कसा विसर पडतो?

  

आव्हानांचे शिखर सर करणारी

"ती" हिरकणी असते

अवकाश सफारीचा विक्रम करणारी

तिही एक "मुसाफिर" असते

  

देशाचे नेतृत्व करणारी

"युवाशक्ती" ती असते

संचलनाचे प्रतिनिधित्व करणारी

'ति'ही एक देशभक्त असते

 

“ती” एका

अव्यक्त कथेप्रमाणे असते

महिला दिनाच्या निमित्ताने

प्रकाशझोतात येते

  

गगनभरारी घेण्यासाठी

‘ति’च्या पंखांना सामर्थ्याची जोड देऊया

समानतेच्या वाटेवर

सन्मानाची सोबत देऊया