पण तसा मी खूष आहे..


भूतकाळात लक्ष गेलं,

करून ठेवलेल्या चुकांचा पसाराच चोहीकडे.

सुधारण्याच्या पलीकडे गेलेल्या बऱ्याच साऱ्या,

पण तसा मी खूष आहे..


निर्णयक्षमते बद्दल गमजा मारणारा,

बरेच चुकीचे निर्णय आ वासून पाहात आहेत.

पश्चात्ताप करायला मुबलक खुराक आहे,

पण तसा मी खूष आहे..


दुःख नेमकं कसलं करायचं,

कुठल्या गोष्टीबद्दल कुढत राहायचं.

पर्याय अगदी पुष्कळ आहेत,

पण तसा मी खूष आहे..


असो भूतकाळातलं लक्ष काढतो,

वर्तमानातल्या चुकांकडे काटेकोरपणे बघतो.

भविष्यातही भूतकाळा कडे बघून म्हणायचंच आहे,

पण तसा मी खूषच आहे..


                         :- मोहित केळकर