आयुष्यात आपण स्वहक्कानी केलेली,
'मित्र' ही पहिली वहिलीच निवड.
जुळणारे स्वभाव, जुळणारे विचार,
जुळणारे छंद, जुळणारी आवड..
असते आपण स्वतः केलेली,
खरं तर हीच पहिली पारख.
मित्रसंगती वरून कळते,
आपल्या व्यक्तिमत्त्वाची नेमकी ओळख..
आई, वडील, पत्नी, मित्र बनले,
की मानलं जातं ते आदर्श नातं.
हे सर्वज्ञात सत्य,
मैत्रीचं महत्त्व थोडक्यात सांगून जातं..
खिल्ली उडवणारे, अवेळी सतावणारे,
सळो की पळो करून टाकणारे मित्र.
पण कुठलीही अडचण आली की,
पार बदलून जातं हे चित्र..
मग तुमच्याही नकळत बनते,
संकटांना झेलणारी एक अभेद्य फळी.
जिवाभावाचे हे दोस्त सुसह्य करतात,
त्या संकटांच्या नकोश्या झळी..
रक्ताच्या नात्याच्याही पार पलीकडे जाणारे,
असतात हे मैत्रीचे ऋणानुबंध.
म्हणूनच खरा भाग्यवान तोच,
ज्याला मित्र जोडायचा असतो छंद..
आयुष्यात आजवर जे चांगलं वाईट घडलंय,
त्यात लाभली आहे नेहमीच मित्रांची साथ.
जीवाला जीव देणारे मित्र असताना,
आयुष्य जगण्याची काही औरच बात..
:- मोहित केळकर