क्षितिज नाचले वाळूभवती वाळु बरळली, ’नाही, नाही.’ अशाच वेळी उंट उगवला; आणि म्हणाला, ’करीन काही.’ अन मानेच्या बुरुजावरती चढले डोळे अवघड जागी; क्षितिज पळाले दूर दूर अन वाळु जाहली हळूच ’जागी’. रूप असे पाहुनी अजागळ भुलले वाळूचे भोळेपण; आणि तिच्या त्या वांझपणावर गळला पहिला सृजनाचा क्षण. उंट चालला वाळूवरुनी वाळु म्हणाली, ’आहे, आहे.’ …खय्यामाने भरले पेले; महंमदाने रचले दोहे. हा यात्रेकरु तिथे न खळला. निळा पिरॅमिड शोधित जाई! तहानेसाठी प्याला मृगजळ; भूक लागता तहान खाई. निळा पिरॅमिड दिसला का पण? …खूण तयाची एकच साधी… निळा पिरॅमिड दिसतो ज्याला तोच पिरॅमिड बनतो आधी