रक्तामध्ये ओढ मातिची, मनास मातीचें ताजेपण, मातींतुन मी आलें वरती, मातीचें मम अधुरें जीवन. कोसळतांना वर्षा अविरत, स्‍नान समाधीमधे डुबावें; दंवात भिजल्या प्राजक्तापरी ओल्या शरदामधि निथळावें; हेमंताचा ओढुन शेला हळूच ओलें अंग टिपावें; वसंतांतलें फुलाफुलांचें छापिल उंची पातळ ल्यावें; ग्रीष्माची नाजूक टोपली, उदवावा कचभार तिच्यावर; जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर; आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरांत काजवे, उभें राहुनी असें अधांतरिं तुजला ध्यावें, तुजला ध्यावें.