करितो आदरे । सद्गुरुस्तवन ज्यांनी सत्यज्ञान । वाढवीले. धन्य पायथॅगोरस । धन्य तो न्यूटन धन्य आईन्स्टीन । ब्रम्हवेत्ता. धन्य पाश्चर आणि । धन्य माझी क्युरी थोर धन्वंतरी । मृत्युंजय. धन्य फ्राइड आणि । धन्य तो डार्विन ज्यांनी आत्मज्ञान । दिले आम्हा. धन्य धन्य मार्क्स । दलितांचा त्राता इतिहासाचा गुंता । सोडवी जो. धन्य शेक्सपीअर । धन्य कालीदास धन्य होमर, व्यास । भावद्रष्टे. फॅरॅडे, मार्कोनी । वॅट, राईट धन्य धन्य सारे अन्य । स्वयंसिद्ध. धन्य धन्य सारे । धन्य धन्य मीही! सामान्यांना काही । अर्थ आहे! सद्गुरूंच्या पाशी । एक हे मागणे : भक्तिभाव नेणे । ऐसे होवो. सद्गुरुंनी द्यावे । दासा एक दान : दासाचे दासपण । नष्ट होवो. सद्गुरुवाचोनी । सापडेल सोय तेव्हा जन्म होय । धन्य धन्य