तो चंद्र छाटो काहिही अन सूर्य काहीही भको; मातीच पायाखालती, नाते तिचे विसरू नको. आत्मास आत्म्याचे मिळे; ते कोण घेईल काढुनी? पण इंद्रिया दरडावुनी शरिरास तू हिणवू नको मोठ्यास मोठे मान तू, त्याहून मोठे चिंतता; पण आपणाही फार छोटे तू उगा मानू नको खोटा गळा काढू नको; खोटा टिळा लावू नको; जीव जडतो त्या ठिकाणी पाय तू अडवू नको. विवेक, संयम, नम्रता असले सदाचे सोबती, तरि व्हायचे वेडे जिथे तेथे मढे होऊ नको. खुश्शाल जा तू मंदिरी, त्याला-तिला देण्या फुले; पण त्यातल्या एका फुला हुंगावया विसरु नको. पोचायचे जेथे तिथे ना ऊन आणिक सावली, म्हणुनी वडाच्या खालती अस्वस्थ तू होऊ नको.