फुंक'-
एकच फुंक -
चूल पेटवण्यासाठी-
माचिस विझवण्यासाठी-
उदबत्ती तेवण्यासाठी -
कचरा उडवण्यासाठी -
दुर्गंध सारण्यासाठी
पेय थंडावण्यासाठी -
वेदना शमवण्यासाठी -
फुंक ती एकच
सिगरेट फुकण्यासाठी-
धूके विरवण्यासाठी-
खाल्ले तिखट सहण्यासाठी-
केर डोळ्यातला काढण्यासाठी-
थंड शेकोटी भडकवण्यासाठी- -
आणि दाखवलाच कोणी तोरा
तर 'गेला उडत' म्हणण्यासाठी-
कधी फूंकतो-
युद्धाच्या तुतारी साठी
पुजेच्या शंखध्वनीसाठी
लग्नाच्या शहनाईसाठी
गोकुळाच्या बासरीसाठी
मारतो कधी एक फूंकर-
थकवा मिटवण्यासाठी
गरमी घालवण्यासाठी
राग विसरण्यासाठी
निराशा भिरकावण्यासाठी
कानामागून गुदगुल्यांसाठी
अन् कधी कधी -
हळूच श्रृंगार फुलवण्यासाठी
कधी मारतो फुंक
योग प्राणायामा साठी
कुडीत प्राण रोखण्यास
कृत्रिम श्वासोच्छासासाठी
फुंकी मधला हा श्वास तोच,
वायू तोच ओठ तेच असले तरी
फुंक मात्र तीच नाही-
जसा तिचा हूँकार आहे
तसा तिचा प्रकार आहे
मनातल्या उद्देशाचा तो
प्रामाणिक आविष्कार आहे
अतुल पाटणे


